सिल्लोड : शहरातील शिक्षकनगर भागातील जय वीर हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली तसेच मारुती मूर्तीच्या कपाळावर लावलेला चांदीचा टिळाही चोरट्यांनी चोरून नेला. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यस्त होत आहे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री गस्त घालत असताना जवळपास दोन-अडीच वाजेपर्यंत या भागात चोरी झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. मात्र, त्यानंतर पहाटे अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. मारुती मंदिराचे चॅनेल गेटचे कुलूप तोडून मंदिरात ठेवलेल्या दानपेटीतील चिल्लर वगळता बाकी पैसे चोरट्यांनी पळविले. यादरम्यान मंदिरात आतील दरवाजा उघडून मारुती मूर्तीच्या कपाळावर लावलेला चांदीचा टिळा चोरट्यांनी चोरून नेला. या चोरीच्या घटनेमुळे शिक्षकनगर व शहरातील भाविक भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील महिनाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसाआड चोर्या करून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना खुले आव्हानच दिल्याचे दिसते. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या चौघांपैकी एकाही चोरीचा तपास पोलिस अद्यापही लावू शकले नाहीत. या चोरीबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करीत आहेत.
शहरातील वाढत्या चोर्यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा व अशा चोरट्यांना तात्काळ अटक करावी नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा जागरण मंचाचे विभागीय अध्यक्ष मनोज मोरेल्लू यांनी दिला आहे.